रोहित पवार नोटीस: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस दिली असून बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सविस्तर बोलण्यास नकार दिला आहे. शरद पवार म्हणाले, “मी कारवाईबद्दल बोलणार नाही.”
काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार?
शरद पवार आज कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बारामतीतील गोविंद बाग येथील निवासस्थानी पोहोचले. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईबाबत सध्या बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस बजावून बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी बोर्डाने रोहित पवार यांना ७२ तासांची मुदतही दिली आहे. या नोटीसमध्ये संबंधित प्रकल्प बंद करण्याच्या सूचना नमूद करण्यात आल्या आहेत. खुद्द रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्यावरील कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "सरकारविरोधात भूमिका घेतल्याने माझ्यावर सूडबुद्धीची कारवाई करण्यात आली आहे. पण आम्ही घाबरणार नाही. राज्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटवस्तू दिल्या असल्या तरी जनतेच्या माध्यमातून त्यांना रिटर्न गिफ्ट मिळणार आहे."
हे देखील वाचा: ‘महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे, 1 वर्षापासून राज्यघटनेविरोधात सरकार चालवत आहे, संजय राऊत यांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा