महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2023 निकाल: बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये अजित पवार यांच्या गटाला मोठे यश मिळाले आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागा अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. भाजपने काटेवाडीत प्रथमच प्रवेश केला आहे. काटेवाडीत भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
काटेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट पुन्हा विजयी होणार की मतदार भाजपला संधी देणार? अशी चर्चाही सुरू झाली होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अखेर बहुप्रतिक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. काटेवाडीत भाजपने प्रथमच दोन जागा जिंकल्या आहेत.
बारामतीत अजित पवारांचा प्रभाव कायम
बारामतीच्या काटेवाडीत अजित पवार आणि भाजपमध्ये टक्कर झाली. सत्तासंघर्षानंतर अजित पवार आपल्या भागातील वर्चस्व कायम ठेवतील का? मतदानादरम्यान अजित पवार गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मात्र अजित पवारांनी काटेवाडीत आपले वर्चस्व कायम राखले आणि 14 जागा जिंकल्या.
भाजपचा प्रथमच विजय
भाजपने यंदा अजित पवार यांच्या गटाला तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे दोन जागा जिंकून भाजपने काटेवाडीत प्रवेश केला आहे. विशेष बाब म्हणजे प्रभाग क्र. 5 आणि प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपचा एक आणि भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशा पवार यांनी या दोन्ही प्रभागात मतदान केले होते. निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. यापूर्वी काटेवाडीत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. काटेवाडीत दोन उमेदवार विजयी झाले असून भाजपसाठी ही बाब महत्त्वाची आहे.
हे देखील वाचा: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक: पुण्यात अजित पवार गट चमकला, 109 ग्रामपंचायतींवर दणदणीत विजय, भाजपनेही केले चमत्कार