मुंबई क्राईम न्यूज : काल रात्री मुंबईतील जुहू परिसरात बसेरा नावाच्या इमारतीखाली संशयास्पद स्थितीत सापडलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिनू विश्वकर्मा (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची (एडीआर) नोंद केली आहे. याप्रकरणी एका हवालदाराला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. खून की आत्महत्या की अपघात, या तिन्ही बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. महिला स्वत: खाली पडली की जमिनीवर ढकलली गेली, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
काय आहे प्रकरण?
घटनेची माहिती मिळताच इमारतीखाली स्थानिक लोक जमा झाले. कॉन्स्टेबल आणि खाली जमलेल्या लोकांनी महिलेला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला ही व्यवसायाने परिचारिका असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत महिलेचे कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ही महिला घटस्फोटित होती आणि एका मुलाची आई होती. ताब्यात घेतलेला पोलीस हवालदार विवाहित आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबईत १६ वर्षीय मुलीवर बलात्कार
मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमधील झोपडपट्टीत एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी झालेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, तर त्याचा एक साथीदार फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीला ओळखत असून दोघेही एकाच परिसरात राहतात. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने त्याच्या मित्रासह पीडितेच्या घरात प्रवेश केला जेव्हा ती घरात एकटी होती.